

सोलापूर : देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय व खासगी क्षेत्रातील रुग्णालयातील सद्यस्थितीतील खाटांची संख्या ही खूपच अत्यल्प आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स संस्थेकडून प्रकाशित केलेल्या हेल्थ इंटेलिजन्स प्रोफाईल या अहवालानुसार देशातील शासकीय रुग्णालयांमध्ये 9 लाख खाटा उपलब्ध असून खासगी रुग्णालयातील खाटांचा यात समावेश केल्यास खाटांची संख्या ही साधारणतः 13 ते 14 लाखच होते. 140 कोटींच्या देशातील रुग्णालयांमधील खाटांचे हे प्रमाण म्हणजे आरोग्याबाबत देशातील विदारक स्थिती दर्शवते. खाटांचे हे प्रमाण वैद्यकीय क्षेत्रातील चिंता करण्यास लावणारी बाब आहे.
आजच्याघडीला देशात प्रति हजार माणसाच्या मागे फक्त 1.3 ते 1.5 प्रमाणात खाटा उपलब्ध आहेत. या उपलब्ध खाटांच्या माध्यमातून सध्या सर्वच स्थरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळते. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार अजून कमीत कमी 20 ते 25 लाख खाटा असणे आवश्यक आहेत. यापूर्वी कोविडसारख्या महामारीच्या काळात ऑक्सिजनयुक्त खाटा, अतिदक्षता (आयसीयू) व कृत्रिम श्वसन यंत्राची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवली, हे चित्र देशाने पाहिले आहे.
शासकीय रूग्णालयापेक्षा 60 टक्क्यांहून अधिक खाटा या खासगी रुग्णालयात उपलब्ध आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान व तातडीच्या वैद्यकीय सेवेबाबतीत शासकीय रुग्णालयापेक्षा खासगी वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णालय कायम आघाडीवर राहिलेले आहेत. यामुळे उपचारांचा खर्च हा गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर जातो.
नागरिकांच्या दैनंदिन एकूण खर्चापैकी आरोग्याच्या खर्चावर जवळपास 45 टक्क्यांहून अधिक रक्कम स्वतःच्या खिशातून करावी लागते. सरकारी रुग्णालयांवरील रूग्णसेवेचा ताण वाढत आहे. लडाख व लक्षद्वीप या केंद्रशासित राज्यातील बेडची संख्या नगण्य आहे.