

सोलापूर : देशभरात आज, शनिवार 16 मे पासून डिजीटल जनगननेला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातही प्रशासनाने तयारी केली असून 28 चार्ज अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 5453 घरयादी गट तयार झाले असून त्याकरिता 6746 प्रगणक व 1175 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. दरम्यान, भारताची ही एकूण 16 वी तर स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे.
जनगणनेअंतर्गत घरयादी व घरगणना क्षेत्रीय काम 16 मे ते 14 जून या कालावधीत पार पडणार असून, त्यासाठी प्रगणकद्वारे 34 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहे. यामध्ये घराची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि मालमत्ता यांचा समावेश असणार आहे.ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असून मोबाईल ॲप आणि वेब पोर्टलचा वापर करण्यात आला आहे. जनगणना कायदा 1948 आणि जनगणना नियम 1990 च्या तरतुदींनुसार. या कायद्यानुसार जनगणनेत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणे हे नागरिकांचे कर्तव्य असून संकलित केलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. 1 मे 15 मे पर्यंत स्वगणना करण्यात आले असून यात 30 हजार हुन अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे.
प्रगणक करतील माहितीची पडताळणी
आजपासून प्रगणक घरी भेट देताना स्व-गणना केली आहे याची विचारणा करतील. स्व-गणना केलेली असल्यास त्याची घेऊन माहितीची पडताळणी करतील. माहिती जुळल्यास ती स्वीकारली जाईल, अन्यथा आवश्यक दुरुस्ती केली जाईल. स्व-गणना केलेली नसल्यास प्रगणक नवीन माहिती संकलित करतील.
माहिती राहणार गुप्त
जनगणनेदरम्यान नागरिकांनी दिलेली माहिती वैयक्तिक माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाते. ही माहिती कोणत्याही न्यायालयात पुराव्यासाठी वापरता येत नाही आणि ती प्राप्तीकर, पोलीस विभागासह कोणत्याही विभागाला ही माहिती पुरवली जात नाही. जनगणनेचा उद्देश हा करवसुली किंवा तपासणी नसून केवळ नियोजनासाठी सांख्यिकी माहिती गोळा करणे, हा आहे.