

सांगोला : माण नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार्या टेम्पोवर कारवाई करून पोलिसांनी सात हजार रुपये किंमतीची वाळू व तीन लाख रुपयांचा टेम्पो असा सुमारे 3 लाख 7 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात चालक व मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पो.कॉ. निशांत सुभाष सावजी, पो.हे.कॉ. कोकरे, पो.कॉ. मारुती पांढरे यांचे पथक सोमवारी रात्रगस्त घालत होते. रात्री 3.20 च्या सुमारास केदारवाडी (सातकी) येथे माण नदीपात्रातून अशोक लेलंड टेम्पोने वाळूचोरी सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी नाईट चेकींग अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विनायक माहुरकर यांना माहिती दिली. त्यांनी पो.कॉ. गणेश कुलकर्णी यांना बोलावून घेतले. मोटारसायकलवरून केदारवाडी सातकी येथे माण नदीपात्रात गेलो असता त्याठिकाणी माण नदीपात्रातून केदारवाडीकडे येणारे नदीपात्रातील रस्त्यावर समोरून एक चारचाकी वाहन येत असल्याचे दिसले.
पोलिसांनी त्या टेम्पोस थांबविले असता टेम्पोचालकाने टेम्पो लांब अंतरावर थांबवून चालक खाली उतरून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी त्याचा नदीपात्रात शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता तो टेम्पो बिस्कीट रंगाचा विना नंबरचा होता. त्यामध्ये 1 ब्रास वाळू दिसून आली. पोलिसांनी वाळू भरलेला टेम्पो पोलिस ठाण्याला आणून जप्त केला आहे. याबाबत निशांत सावजी यांनी अज्ञात टेम्पोचालक व मालकाविरुद्ध अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.