

पंढरपूर : देगाव (ता. पंढरपूर) येथे देगाव ते बाभूळगाव जाणाऱ्या रोडवर यादव यांच्या वीट भट्टीजवळ करण्यात आलेल्या अवैध वाळूचा साठ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत दोन टीप्पर, एक जेसीबी व 8 ब्रास अवैध वाळू साठा दि. 14 रोजी जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना गोपनिय माहिती मिळाल्याने त्यांच्या कार्यालयाकडील पोलीस पथकातील पोलीस अंमलदार हे देगाव येथे गेले. देगाव ते बाभूळगाव जाणारे रोडवर यादव यांच्या वीट भट्टीजवळ मोकळ्या जागेत वाळू साठा दिसून आला.
वाळू जेसीबी मशीनच्या साह्याने दोन टीप्पर वाहनात भरत असल्याचे दिसून आले. तेव्हा टीप्पर आणि जेसीबी चालकास जागीच पकडण्यात आले. जेसीबी चालक प्रवीण नानासाहेब बोराटे (वय 35) रा. मुंडेवाडी, ता. पंढरपूर तसेच टिपरचालक विश्वास हनुमंत चव्हाण (वय 43) रा. सुस्ते ता. पंढरपूर, तर मालक बालाजी मारुती पवार रा. देगाव असे असल्याचे सांगितले. तर टिपर मालकाचे नाव विचारले असता त्यांनी सदरचे टिपर हे सोमनाथ जाधव रा. देगाव यांचे मालकीची असल्याचे सांगितले.
दोन टीप्पर प्रत्येकी 4 ब्रास वाळू भरल्याचे दिसून आले. त्यापैकी एक टिपर क्र. (डब्ल्यू बी 53 बी 1430) व दुसरा टिपर क्र.(एम.एच. 13 डिक्यू 2858) व बिगर क्रमांकाचा जेसीबी ताब्यात घेण्यात आला. यावेळी 8 ब्रास वाळू साठा मिळून आला. पो.उपनिरीक्षक भोसले यांनी ग्राम महसूल अधिकारी डी. बी. कोताळकर यांना बोलावून माहिती देऊन पुढील कारवाईकामी त्यांच्या ताब्यात वाळू साठयासह दिले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोहेकॉ रोकडे, खिलारे, रोंगे, पोना शिंदे, पोकॉ हुलजंती लोंढे यांनी पार पाडली आहे.