

सोलापूर : सोलापुरातून रक्ताची तस्करी तर होतेच आहे, त्याचबरोबर आणखी पैशाच्या हव्यासापोटी रक्तातून वेगळा केलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची बाब ‘पुढारी’च्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाली आहे. हैदराबादमधील औषध कंपन्यांना हा प्लाझ्मा पाठविण्यात येत आहे. विविध प्रकारची औषधे तयार करण्यासाठी या प्लाझ्माचा उपयोग हैदराबादमधील संबंधित कंपन्या करत आहेत. प्लाझ्माच्या या तस्करीतून सोलापुरातील काही रक्तपेढ्यांना कोट्यवधी रुपये मिळत असल्याची माहितीही या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाली.
दरम्यान, ‘सोलापुरातून होतेय रक्ताची तस्करी’ अशा आशयाचे वृत्त ‘पुढारी’ वृत्तपत्र तसेच ‘पुढारी न्यूज चॅनल’द्वारे प्रसिद्ध होताच राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रक्ताच्या तस्करीनंतर आता त्यापुढील आणखी एक तस्करी ‘पुढारी’च्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली आहे, ती तस्करी म्हणजे प्लाझ्माची.
सोलापूर परिसरातील काही रक्तपेढ्या रक्ताची तस्करी करण्यास हातभार लावत असून, रक्तदात्याकडून 350 एम.एल.ऐवजी 410 एम.एल. रक्त काढत आहेत. या रक्तातून दोन प्रकारचा प्लाझ्मा वेगळा केला जात आहे. यातील एक प्लाझ्मा रुग्णांसाठी, तर दुसरा औषध बनविण्यासाठी वापरण्यात येत आहे. औषधे बनविण्यात येणारा प्लाझ्मा हैदराबाद येथील औषध कंपन्यांना तस्करांकडून पुरवला जात आहे. रक्तपेढ्यांचे व्यवस्थापन आणि तस्कर यांच्याती अभद्र युती असल्याने या प्लाझ्माची जुजबी नोंद रक्तपेढ्यांच्या रजिस्ट्रमध्ये करण्यात येते. उर्वरित प्लाझ्माचा मोठा साठा हा कोणत्याही नोंदीविना तस्करांद्वारे हैदराबादकडे पाठवला जात आहे. तो पाठवताना कोणतीही पुरेशी काळजी घेतली जात नाही.
प्लाझ्माच्या एका पिशवीसाठी एक हजार रुपयांपर्यंतचा दर दिला जातो. हा दर गरजवंताच्या मागणीनुसार खूप वर सरकतो. यातून तस्कर आणि रक्तपेढ्यांना करोडो रुपये मिळत असल्याचे ‘पुढारी’च्या स्टींग ऑपरेशनमधून पुढे आले आहे. पैशाला चटावलेल्या रक्त आणि प्लाझ्मा तस्कारांना, रक्तपेढ्यांना रक्तदात्याच्या जिवाशी काही देणे घेणे नसल्याचेही यातून सिद्ध होत आहे.
रक्तदान शिबिरांसाठी महागड्या वस्तूंच्या भेटीचे आमिष
रक्तासह प्लाझ्माच्या तस्करीतून मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असल्याने जास्तीत जास्त रक्त कसे मिळेल याकडे तस्करांसह रक्तपेढ्यांचे लक्ष आहे. यातून हल्ली सोलापुरात रक्तदान शिबिरांचा अक्षरशः सपाटा लागला असून या शिबिरामध्ये शेकडो रुपयांच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जात आहेत. या वस्तू देऊन रक्त देण्याचा तस्करांचा फंडा म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार असल्याचे ‘पुढारी’च्या स्टींग ऑपरेशनमधून स्पष्ट होत आहे.
रक्तदान शिबिरे मिळविण्यासाठी रक्तपेढ्यांमध्ये जणू स्पर्धाच सुरू आहे. रक्तदान शिबिरे मिळवणे, रक्तदात्यांचे जास्तीचे साठ एमएल रक्त काढणे आणि त्याची तस्करी करणे हा येथील व परराज्यातील साखळी असणार्या तस्करांसह काही रक्तपेढ्यांचा नवा गोरखधंदा झाला असल्याचेही ‘पुढारी‘च्या स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झाले.
तब्बल 500 एम.एल. रक्त घेतले जातेय
नियमानुसार रक्तदात्याच्या शरीरातून एकावेळी फक्त 350 एम.एल. रक्त संकलित करण्याची परवानगी असते. परंतु, रक्तासह प्लाझ्मा तस्करी करण्यासाठी जास्तीचे रक्त दात्याच्या शरीरातून घेतले जात असल्याचे ‘पुढारी’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये स्पष्ट झाले. काही शिबिरांत तर धष्टपुष्ट रक्तदात्याची रक्तदानाप्रसंगी रक्तपशिवी हलती ठेवून 500 एम.एल.पर्यंत रक्त काढण्यात येत आहे. तस्करांशी निगडित रक्तपेढ्यांमधील कर्मचारी हे काम बेमालुमपणे पार पाडत आहेत. विशेष म्हणजे, यासाठी कर्मचार्यांना खास प्रशिक्षण दिल्याचेही ‘पुढारी’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले.