Solapur News : चोरुन सुरु केला दवाखाना; प्रशासनाचा कारवाईचा बडगा
सोलापूर : महापालिकेच्या हॉस्पिटलमधील रुग्ण पळवापळवी प्रकरणात नवी पेठेतील श्रेयश नर्सिंग होम सील केले होते. तरी देखील श्रेयश हॉस्पिटलचे डॉ. सुमित आणि डॉ. श्रद्धा सुरवसे हे दाम्पत्य बाळे येथे चोरून हॉस्पिटल चालवत असल्याचा धकादायक प्रकार महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी बुधवार दि. 13 ऑगस्ट रोजी धाड घालून उजेडात आणला आहे. या हॉस्पिटलला पुन्हा टाळे ठोकलेअसून गुरूवारी रितसर प्रक्रिया करून हे हॉस्पिटल सील केले जाणार आहे.
महापालिकेच्या हॉस्पिटलमधील रुग्ण पळवापळवी प्रकरणात हॉस्पिटल आणि डॉक्टारांचा हात असल्याने तसेच हॉस्पिटलच्या नर्सिंग ओपीडी रजिस्टरमध्ये महापालिकेच्या आशा वर्करांना दोन हजार रुपयांपर्यंतचा कट (रक्कम) दिल्याचा आणि मुुंबई नर्सिग अॅक्टचा भंग केल्या प्रकरणी 1 ऑगस्ट रोजी हॉस्पिल सील केले होते. तर श्रेयश हॉस्पिटलचे सुमित आणि श्रद्धा सुरवसे डॉक्टर दाम्पत्यांस नोटीस बजावली होती. त्यानंतर हे दाम्पत्य फरार झाले होते. हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या वतीने तयार केला असताना बाळे गावात हे डॉक्टर दाम्पत्य हॉस्पिटल चालवत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी बुधवार दुुपारी अचानक धाड घालून तपासणी केली.
महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता महापालिकेस माहिती लपवून रुग्णांची तपासणी केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्याशिवाय त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटर, डिलिव्हरी रूम, सोनोग्राफी मशिन देखिल आढळुन आली आहे. गेल्या अनेक दिवासापासून या ठिकाणी पेंशटही तपासले जात होते. रुग्णांच्या मोठ्या रांगा देखिल लागल्या होत्या .सध्या या हॉस्पिटलला टाळे ठोकण्यात आले आहे. गुरूवारी रितसर प्रक्रिया करून हॉस्पिटल सील केले जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी दिली.

