

महूद : सांगोला तालुक्यातील वाकी (शिवणे) अंतर्गत असलेल्या जाधववाडी येथील राजू दिगंबर होवाळ या शेतकऱ्याच्या देशी कोंबडी पोल्ट्री फार्मवर तरसांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 133 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सांगोला तालुक्यातील वाकी(शिवणे) अंतर्गत जाधववाडी येथे राजू दिगंबर होवाळ या शेतकऱ्याची शेती आणि देशी कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म आहे. संध्याकाळी नियमितपणे याठिकाणी त्यांच्या घरातील व्यक्ती मुक्कामाला असतात. मात्र काल होवाळ यांच्या नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे याठिकाणी कोणीही मुक्कामाला नव्हते.
त्यामुळे बुधवारी (दि. 6) रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास परिसरातील तरसांनी या कोंबड्यांच्या फार्मवर हल्ला केला. जाळी तोडून आत घुसलेल्या तरसांनी देशी कोंबड्यांचा फडशा पाडला. तर अनेकांवर हल्ला केल्याने त्या जागी मरून पडल्या. तरसाच्या या हल्ल्यात सुमारे 133 कोंबड्या मरण पावल्याने राजू होवाळ यांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी व वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.
नुकसान भरपाई मिळावी
कोंबडी पालन करताना शेतकऱ्यांना वाढत्या उन्हाचा तसेच रोगराईचा सामना करावा लागत आहे. तर कधी चोरट्यांचा देखील सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कोंबडी पालन करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. अशातच तरसासारखे प्राणी, सायाळ हल्ला करत असल्याने मोठे नुकसान होत आहे. शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.