

सोलापूर : शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील कोनापुरे चाळ परिसरातील रस्त्यांचे काम निकृष्ट झाले आहे. रस्त्याचे काम पुन्हा करावे, या मागणीसाठी निलेश संगेपान यांनी गुरुवारपासून (दि.12) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
त्यामुळे महापालिका प्रशासनावर टिका होत आहे. कोनापुरे चाळ परिसरात पाईपलाईन काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करताना संपूर्ण रुंदीमध्ये डांबरीकरण न करता अत्यल्प जाडीचे नियमबाह्य डांबरीकरण केले आहे. तसेच एक इंच काँक्रीट टाकण्यात आले आहे. त्यामुळे संगेपान यांनी गुरुवारी (दि.12) पासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशीपासून नागरिकांनी आंदोलनास्थळी भेट देत लेखी पाठिंबा नोंदवित आहेत. हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेचा आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत. आंदोलन स्थळी श्रीकांत वाघमारे, जुबेर हिरापुरे, मल्लिकार्जुन पिलगेरी, आकाश गायकवाड, सुचित्रा वाघमारे आदी उपस्थित आहेत.