

सोलापूर : जिल्हा परिषद, महापालिकेच्या बर्याच शाळेत कंत्राटी शिक्षक सेवेत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांनी जिल्हा परिषदेच्या 83 आणि महापालिकेच्या 17 अशा एकूण 100 शिक्षकांना शासकीय सेवेत समावून घेतले आहे. त्यामुळे त्या शिक्षकांना शासकीय सेवेची लॉटरी लागल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.
सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील बरेच शिक्षक गेल्या वीस वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेत कंत्राटी पद्धतीने सेवेत आहेत. त्यातील शंभर शिक्षकांना शासकीय सेवेत समायोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने तसे आदेश दिले होते. त्यानुसार सीईओ जंगम, शिक्षणाधिकारी शेख यांनी शासकीय सेवेत समावून घेतले आहे.
दरम्यान, कंत्राटी शिक्षकांना शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून शिक्षकांतून होती. मात्र, जिल्हा परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने कंत्राटी शिक्षकांना शासकीय सेवेत घ्यावे, असे आदेश शासनास दिले. त्यानुसार शासनाने शिक्षण विभागास पत्र काढल्याने कंत्राटी शिक्षकांना जिल्हा परिषदेने शासकीय सेवेत समावून घेतले आहे.