

बार्शी : नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रभर मुक्कामी राहिल्या. काढण्यात आलेला मोर्चा धरणे आंदोलनात रूपांतरित होऊन दोन दिवस त्या मुक्कामी राहिल्या.
दिवसाला शंभर रुपये एवढ्या अवघ्या वेतनावर काम कसे करायचे? असा तीव्र प्रश्न या महिलांनी उपस्थित केला आहे. आयटक संलग्न आरोग्य खाते अंशकालीन अर्धवेळ स्त्री परिचर कृती समितीच्यावतीने राज्य शासनाविरोधात नागपूर विधानसभा हिवाळी अधिवेशनावर त्यांनी मोर्चा काढून प्रश्न मांडले. या विराट मोर्चात सोलापूर जिल्ह्यातील अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे व सचिव कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली त्या नागपूरला गेल्या होत्या.
आरोग्यमंत्री यांची शिष्टमंडळाला भेट झाल्याशिवाय मोर्चा माघारी घेणार नाही, अशी भूमिका घेऊन त्यांनी आंदोलन केले. अखेर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शिष्टमंडळाला भेट दिली व आश्वासन दिले. शिष्टमंडळात राज्याध्यक्ष कॉ. राजू देसले, आयटक राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे, कॉ. विनोद झोडगे, कॉ. दिलीप उटाणे, कॉ. बुरुड आदींचा समावेश होता. किमान वेतनात वाढ करण्यात यावी, अशा मुख्य मागणीसह नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला. प्रश्न सोडवणुकीचे आश्वासन प्राप्तनंतर आंदोलनकर्ते परतले.