

सोलापूर : सोलापूर शहर परिसरात दोन महिन्यांपासून अपघातांचे सत्र सुरुच आहे. सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-हैदराबाद मार्गांवर सुसाट बल्कर, कारने रस्ता ओलांडणार्यांना चिरडल्यानंतर या मार्गांवरील अतिक्रमण काढले; पण शहरात इतर ठिकाणच्या अतिक्रमित वाहनांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला. वाहनांच्या वेगावर नियंत्रण कोण अन् कसे आणणार? असा प्रश्न या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अपघात होणार्या रस्त्यावर अतिक्रमित गाड्या हटविल्या खर्या, वाहने मात्र अवैधपणे बिनभोबाट रस्त्यावर उभी राहतात. अनेकांचा जीव गेला आहे. मग, मृत्यू झाल्यानंतरच अतिक्रमणधारकांवर कारवाई करणार काय?, अजून किती मृत्यूची वाट पाहणार असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कडेच्या व्यावसायिकांना हटविण्यासाठी मनपाच्या वतीने अतिक्रमण मोहीम सुरु केली होती. पण, ही मोहीम काही महिन्यातच बंद पडली. याशिवाय अतिक्रमित व्यावसायिकांच्या काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. पण, पुन्हा त्याचे काय झाले हे अनुत्तरीतच आहे.
सोलापूर-अक्कलकोट महामार्गांवर वाहने सुसाट धावतात. रस्त्यावर गतिरोधक नाहीत. तरीही कार चालकाने वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. जेणेकरून अपघात होणार नाहीत. पण, याकडे लक्ष देणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.