

Horrific Accident on Kurul-Kamati Road; Youth Dies on the Spot, One Seriously Injured
कामती : पुढारी वृत्तसेवा
मोहोळ तालुक्यातील कुरुल-कामती रस्त्यावर सोमवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. पिकअप वाहन आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मृत तरुणाचे नाव चेतन तानाजी पवार (वय २७, रा. कामती बु.) असे आहे. तर अमोल कुमार भोसले (वय ३३) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही कामती बु. येथील रहिवासी आहेत.
माहितीनुसार, औढी येथून भाजीपाला घेऊन एक पिकअप वाहन सोलापूरच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी चेतन पवार आणि अमोल भोसले हे मोटारसायकलवरून कुरुलकडे जात होते. निकम यांच्या मंगल कार्यालयासमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या धडकेत चेतन पवार यांना डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अमोल भोसले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते माऊली निकम यांनी तत्परता दाखवत जखमी अमोल भोसले यांना स्वतःच्या वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.