

सोलापूर : नुकत्याच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. आता पुढील शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले घरपोच देण्यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी महाविद्यालय व शाळास्तरावर शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
ही शिबीरे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून घेतली जाणार आहेत. इयत्ता 10 वी व 12 वी नंतर पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेताना विविध प्रकारचे दाखले जोडावे लागतात. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलिअर आदी दाखले जोडणे बंधनकारक असते. सध्या जिल्ह्यातील तहसील स्तरावरुन सेतू सुविधा केंद्रातून आणि महा ई सेवा केंद्रातून मागणी अर्जानुसार दाखले दिले जातात. शैक्षणिक प्रवेशासाठी दरवर्षी मे अखेरपासून ते जून महिन्यात दाखल्यांसाठी सेतू सुविधा केंद्र, महाईसेवा केंद्रावर मोठ्याप्रमाणात विद्यार्थी आणि पालकांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत दाखले मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी दलालांचा सुळसुळाट असतो. यात विद्यार्थ्यांची आर्थिक लुट होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दाखल्यांसाठी शिबीराच्या माध्यामातून सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, शेतकरी असल्याचा दाखला असे दाखले देण्याचा अधिकार तहसीलदार पातळीवरुन होता. परंतु जातीच्या दाखल्याचा अध्किार प्रांताधिकार्याकडे असल्याने कागदपत्रे घेतल्यानंतर त्याची छाननी करुन दाखले दिले जाणार आहेत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.