बार्शी : पुढारी वृत्तसेवा
बार्शी तालुक्यात बुधवारी (दि. 25) सायंकाळी वादळी वार्यासह व मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. तालुक्याच्या पूर्व भागातील मळेगाव, पांगरी, सौंदरे व परिसरात नदी- नाले तुडुंब भरून वाहत होते. परिणामी, अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली.
सौंदरे येथे ओढ्याला आलेल्या पाण्यात चार दुचाकी वाहून गेल्या.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काटेगाव ते कळंबवाडी रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले. त्यामूळे पुलावरील रस्ता ओलांडताना शिक्षक, विद्यार्थी व पालकांना मोठी कसरत करावी लागली. गत दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकर्यांच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
सोलापूर शहरातही मुसळधार
सोलापूर शहर परिसरातही मंगळवारी रात्री व बुधवारी (दि. 25) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सायंकाळी झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पुढील एक-दोन दिवसही जोरात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्तकेला आहे.

