

पंढरपूर : राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. जिल्ह्यातही तापमान वाढले असून पंढरपूरमध्ये उष्माघाताने तरुणाचा मृत्यू झाला. दिनेश प्रकाश देशमुख (वय 24, रा. पंढरपूर) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दिनेशचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा दावा केला आहे.
दिनेश देशमुख हा उन्हातून घरी आल्यानंतर आजारी पडला. दुपारी 3.30 ते 4 वाजता त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि यातच त्याचा प्राण गेला. दिनेशचा भाऊ अजय यानेही दिनेशचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे सांगितले. दिनेश याचे घर हे पूर्ण पत्र्याचे आहे.
सध्या पंढरपूरमध्ये तापमान 41 ते 43 अंशांपर्यंत वाढत आहे. यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून अक्षरश: शरीराची लाही लाही होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.