

सोलापूर : बॉलिवूडमधील ऐतिहासिक शोले चित्रपटातील असराणी यांचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. आधे इधर जाओ... आधे उधर जाओ... बाकी मेरे पीछे आओ... हा मिश्कील डायलॉग सोलापुरातील शिवसेनेला चपखल बस बसतो. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांचा आढावा घेतला असता शिवसेनेच्या फुटीनंतर अर्धे नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या यांच्या मागे गेले. काही नगरसेवक आ. विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपत गेले. उरलेले नगरसेवक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत.
एकसंघ शिवसेनेचा जिल्ह्यामध्ये मोठा दबदबा होता. एकेकाळी चार आमदार होते. मात्र तरीही महापालिकेच्या सभागृहात दोन अंकी सदस्य संख्या कधीच गेली नाही. महापालिकेच्या मागील निवडणुकीमध्ये स्व. महेश कोठे यांच्यासारखे कणखर नेतृत्व मिळाल्यामुळे शिवसेनेेच्या नगरसेवकांची संख्या 21 झाली. एकूण पाच प्रभागांमध्ये शिवसेनेचा करिश्मा दिसून आला.
प्रभाग सहामधून गणेश वानकर, मनोज शेजवाल, वत्सला बरगंडे, ज्योती खटके, प्रभाग सातमधून देवेंद्र कोठे, अमोल शिंदे, मंदाकिनी पवार, सारिका पिसे, प्रभाग 10 मधून प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, मीरा गुर्रम, सावित्री सामल, प्रभाग 11 मधून स्व. महेश कोठे, राजकुमार हंचाटे, अनिता मगर, कुमुद अंकराम हे शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेच्या उमेदवारांनी अनेक मातब्बर आजी-माजी नगरसेवकांचा पराभव करत महापालिकेत प्रवेश केला होता. प्रभाग 12 मधून विनायक कोंड्याल, प्रभाग 17 मधून भारत बडूरवाले, प्रभात 19 मधून गुरुशांत धुत्तरगावकर, प्रभाग 22 मधून उमेश गायकवाड, लक्ष्मण जाधव यांच्यासह शशिकांत कैंची यांच्यारुपाने एक स्वीकृत नगरसेवकांची शिवसेनेची फौज होती.
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदही पहिल्यांदाच शिवसेनेला मिळाले होते. स्व. महेश कोठे, अमोल शिंदे यांनी महापालिकेत सक्षम विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजावत सत्ताधारी पक्षावर चांगला वचक ठेवला होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा आढावा घेतला असता, 21 नगरसेवकांपैकी गणेश वानकर, भारत बडूरवाले, लक्ष्मण जाधव हे तीनच नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत. महेश कोठे, वत्सला बरगंडे या दोन नगरसेवकांचे निधन झाले आहे. गुरूशांत धुत्तरगावकर यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. दोन्ही शिवसेनेची वाट खुप बिकट असल्याचे दिसून येत आहे.
देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यांच्यासमवेत विनायक कोंड्यालही भाजपवासीय झाले आहेत. त्याशिवाय राजकुमार हंचाटे, अनिता मगर हे आमदार विजयकुुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये सहभागी झाले. तर सारिका पवार, मंदाकिनी पवार, ज्योती खटके या राजकारणात जास्त सक्रिय दिसत नाहीत.
राज्यात शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येही फूट पडली. शिवसेनेच्या अमोल शिंदे, मनोज शेजवाल, उमेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश करत महायुतीत सहभागी झाले. आगामी महापालिका निवडणूक महायुुतीच्या माध्यमातून लढण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीचे सक्षम नेतृत्व करू शकेल, असे सध्यातरी शिवसेनेमध्ये कोणी नाही. महाविकास आघाडीसमवेत शिवसेनेचे मतभेद झाल्याने शिवसेना बाहेर पडली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरप्रमुख पदावर नियुक्ती झालेल्या पदाधिकार्यांबद्दल पक्षामध्ये नाराजी आहे. परिणामी सक्षम नेतृत्वाअभावी यंदा शिवसेनेची महापालिकेची वाट बिकट राहण्याची शक्यता आहे.
प्रथमेश कोठे, विठ्ठल कोठा, मिरा गुुर्रम, सावित्रा सामल, कुमुद अंकाराम हे राष्ट्रवादी काँग्रेस शऱदचंद्र पवार पक्षात आहेत. मात्र महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमेश कोठे जे निर्णय घेतील त्यावर या नगरसेवकांची मदार आहे.