

सोलापूर : शोले या सुप्रसिद्ध चित्रपटातील जेलर पात्राचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. ‘आधे इधर जाओ, आधे उधर जावो...अगदी याच स्टाईलने सोलापुरातील जेलरने चार कैद्यांना तुरुंगाबाहेर काढले अन् चक्क नळासाठी दहा फूट लांबीची चर खोदण्यास पाठवले. ते ही अगदी शोले स्टाईलने, निम्मे एका बाजूला तर उरलेले निम्मे दुसर्या बाजूला. मात्र, जेलरच्या या कृतीने सोशल मीडिया अक्षरशः ओसंडून वाहिला.
सोलापुरातील किडवाई चौकात तुरुंग आहे. याठिकाणी 540 कैदी आहेत. या तुरुंगात पाण्याची कमतरता निर्माण झाली. या तुरुंगास होणारा पाणीपुरवठा कमी पडत आहे. यामुळे महापालिकेने तुरुंगास पाण्याचे दोन इंचाचे कनेक्शन द्यावे, म्हणून जेलरने तीन महिन्यांपासून महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरू केला. वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रतिसाद देत नसल्याने जेलरनी ‘शोले’स्टाईल भूमिका घेतली अन् चक्क चार कैद्यांनाच तुरुंगातून बाहेर काढले. रस्त्यावरील पाण्याची मुख्य लाइन ते जेलर अशी दहा फूट चर खोदण्याचे काम जेलरने या कैद्यांना दिले ते ही अगदी ‘आधे ऊधर जाओ, आधे इधर जावो...’ या स्टाईलने. खुद्द जेलरचाच वरदहस्त लाभल्याने कैद्यांनी देखील ताकदीने चर खोदली. त्या कैद्यांच्याच मदतीने नवे नळ कनेक्शनही जोडून घेतले. विशेष म्हणजे याठिकाणी जेलरने कैद्यांवर वॉच ठेवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप बाबर, इलाईत तांबोळी यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना तैनात केले होते. ही माहिती याप्रसंगी कर्तव्यावर असणार्या पोलिसांनीच दिली.
दरम्यान, जेलरच्या या कृतीवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली. काहींच्या मते कैद्यांच्या पाण्यासाठी जेलरने ही रिस्क घेतली तर काहींच्या मते तुरुंगाबाहेर काढलेले कैदी पळून गेले असते तर काय... एकूणच हा विषय सोशल मीडियावर दिवसभर गाजला.
जेलरने ही कृती केली खरी पण यावेळी जर कैदी पोलिसांच्या हातावर तुरू देऊन पळाले असते तर... असा प्रश्न निर्माण झाला. जर कैदी पळाले असते तर त्याची जबाबदारी जेलरची की त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची हा ही प्रश्न याठिकाणी निर्माण झाला. मात्र, जे झालेच नाही त्याची चर्चा करण्यात काय अर्थ.