

सोलापूर : समाजात महिलांमध्ये कर्करोग बळावत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. कर्करोग झालेल्या महिलांची केमोथेरपी केल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचे केस झपाट्याने नष्ट होतात. तेव्हा त्यांचे रूप, सौंदर्य सावरण्यासाठी केस दान करण्याची चळवळ उभी करून कर्करोगग्रस्त महिलांना आधार देण्याचा संकल्प 39 वर्षांच्या समाजसेवेची परंपरा लाभलेल्या, महिला आणि मुलींच्या विवाहासाठी अनेकविध उपक्रम राबविणार्या इनरव्हील क्लब ऑफ सोलापूरच्या पदग्रहण सोहळयात पदाधिकारी व सदस्यांनी केला.
इनरव्हील क्लब ऑफ सोलापूरच्या नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिकासिंह आणि ज्येष्ठ समाजसेविका विद्या म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आय. एम. ए. हॉलमध्ये नुकताच पार पाडला. नूतन अध्यक्षा भारती पटेल यांनी मावळत्या अध्यक्षा श्रद्धा काबरा यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. याशिवाय सचिवा दीप्ती देसाई तर खजिनदार जेमिनी बक्षी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी पदग्रहणाची शपथ घेतली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी इनरव्हील क्लबच्या स्वयंसेवी सेवाभावी कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. या संस्थेशी जोडले गेलेल्या महिलांनी समाजाची काळजी घेण्याबरोबरच स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपले पाहिजे. त्यासाठी स्वतःसाठीही वेळ द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्या म्हात्रे यांनी समाजात महिलांमध्ये कर्करोग बळावत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून कर्करोग झालेल्या महिलांची केमोथेरपी केल्यानंतर त्यांचे डोक्यावरचे केस झपाटयाने नष्ट होतात. त्यांचे रुपसौंदर्य सावरण्यासाठी महिलांनी केस दान करण्याची चळवळ उभी करावी, अशी सूचना केली. सूत्रसंचालन नंदा करवा यांनी केले. आभार रश्मी पटेल यांनी मानले. या कार्यक्रमास क्लबच्या माजी डिस्ट्रिक्ट अध्यक्षा (पीडीसी) रेखा माने, पद्मजा अय्यंगार, अनुराधा चांडक यांच्यासह क्लबच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती.