

सोलापूर : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात कष्ट करुन वाढवलेली काँग्रेस खा. प्रणिती शिंदे यांनी संपवण्याचे काम केल्याची जहरी टीका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. शिंदेसाहेबांनी आयुष्यभर कष्ट करुन मोठे केलेल्या कार्यकर्त्यांचे तसेच निष्ठावंताचे वाटोळे करण्याचे काम प्रणितीताईंनी केल्याचेही पालकमंत्री गोरे म्हणाले.
महापालिका निवडणुकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खा. प्रणिती शिंदे यांच्यात शाब्दीक कलगितुरा रंगला आहे. गिरे तो भी टांग उपर या पालकमंत्र्यांच्या टीकेनंतर खा. प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांची संस्कृती दिसत असल्याची टीका केली होती, यावर पुन्हा पालकमंत्री गोरे यांनी खा. प्रणिती शिंदे यांना टार्गेट करीत जहरी टीका केली.
पालकमंत्री गोरे म्हणाले, मी काँग्रेसचा होतो हे सांगण्यासाठी प्रणितीताईंच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. सोलापुरात शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस खा. प्रणिती शिंदे यांनी संपवण्याचे काम केले. आयुष्यभर कष्ट करुन मोठे केलेले कार्यकर्ते, निष्ठावंत मोठे केले, जपले यांना बाजूला सारून वाटोळे केले. ज्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खा. प्रणिती शिंदे यांची गरज होती त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कपणे उभे राहण्याची गरज होती, परंतु त्या उभ्या राहिल्या नाहीत. दोन नगरसेवक आल्यावरही त्यांना समाधान वाटतंय आणि 87 नगरसेवक आलेल्या भाजपावर त्या टीका करत आहेत. मी बोललो, त्यांना लागायचे कारण नाही असेही गोरे म्हणाले.