

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषाणावेळी सोलापुरातील चार हुतात्मा पैकी तीन हुतात्मांचे नाव घेतले. मात्र, चौथे हुतात्मा कुर्बान हुसेनचे नाव त्यांच्याकडून राहिल्याने पालकमंत्र्यांवर काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे, प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आणि एमआयएम नेत्यांनी जोरदार टिका केली आहे.
पालकमंत्री गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण केल्यानंतर भाषण करतेवेळी त्यांनी सोलापूरचे हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे यांचे नाव घेतले. मात्र, हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे नाव न घेतल्याने काँग्रेस, एमआयएमसह इतर पक्षातील नेते, कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चार हुतात्म्यांचे बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. मात्र, पालकमंत्री गोरे यांनी हुसेन या हुतात्माचे नाव वगळून सोलापूरकरांचा अपमान केला असून, त्यांनी सोलापूरकरांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस, एमआयएस पक्षातील नेते, पदाधिकारी करत आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणादरम्यान हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे नाव घेतले नाही. हे नाव विसरणे म्हणजे फक्त एका हुतात्म्याचा नव्हे, तर संपूर्ण सोलापूरचा आणि प्रत्येक सोलापूरकराचा अपमान आहे, असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी सांगितले.