

सोलापूर : परदेशातील नामांकित विद्यापीठांकडे भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला असून, विविध 60 देशांतील विद्यापीठात महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये इटली, जपान, नॉर्वे, अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, कतार, कॅनडा, युएई, तैवान, युगांडासह इतर अनेक देशात राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विविध देशांतील विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांचा समावेश करत असून, त्यामध्ये सातत्याने अपडेट करत असल्याने राज्यातील विद्यार्थी आकर्षित होत विदेशातील विविध विद्यापीठांत प्रवेश घेत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. वैद्यकीय क्षेत्रासह इतर सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमात इतर देशातील विद्यापीठे आघाडीवर असल्याने विद्यार्थ्यांची विदेशाला पसंती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विदेशात शिक्षणासाठी जाणारा लोंढा थांबविण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठे दर्जेदार बनविण्याची शासनाने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, याकडे शासन, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील हजारो विद्यार्थी विविध देशांत शिक्षण घेत असल्याचे दिसत आहे.
मुंबई विद्यापीठात 258 विदेशी विद्यार्थी
एकीकडे राज्यातील हजारो विद्यार्थी विविध देशांतील विद्यापीठात प्रवेश घेत आहेत. तर दुसरी विविध 61 देशांतील 258 विद्यार्थी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. राज्यातील इतर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाचे आदर्श घेऊन दर्जेदार विद्यापीठ तयार करून विदेशातील विद्यार्थी प्रवेश घेतील, असे विद्यापीठ तयार करण्याची गरज आहे.
विदेशी जाण्याचा लोंढा थांबविण्याची गरज
राज्यातील हजारो विद्यार्थी विदेशात शिक्षण घेऊन तेथेच राहत आहेत. त्यामुळे राज्यातील उच्चशिक्षित हुशार पिढीचा फायदा दुसर्या देशाला होत आहे. त्यामुळे राज्यातील हुशार पिढी राज्यातच राहून त्याचा फायदा राज्याला होण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी पालकांतून होत आहे.