

सोलापूर : बोरामणी (दक्षिण सोलापूर) येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 33 एकर जागेत माळढोक पक्षाचे अस्तित्व आहे की नाही, याबाबत पुन्हा एकदा सर्वेक्षण होणार आहे. रविवारी (दि. 21) यासाठी बैठक होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
बोरामणी येथे माळढोक असल्याचा अहवाल यापूर्वी वनखात्याने दिला होता. मात्र यास आता सुमारे आठ वर्षांचा कालावधी झाला आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन व प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सोलापुरातून गोवा विमानसेवा सुरू झाली आहे. महिनाभरात बंगळुरु व मुंबईची विमानसेवाही सुरू होत आहे. मात्र होटगी रोडवरील विमानतळावर नाईट लॅडिंगची सुविधा नाही. याशिवाय या ठिकाणी अनेक अतिक्रमणे असून यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन अधिकारी, वन खात्याचे अधिकारी व विमानसेवेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बोरामणी येथील माळढोकच्या फेरसर्वेक्षणाबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
अहवालामुळे अडचण
बोरामणीत राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी यापूर्वीच सुमारे सोळाशे एकर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. मात्र, याठिकाणी रनवेवरील 33 एकर क्षेत्रात माळढोकचे क्षेत्र असल्याचा अहवाल डेहराडून येथील सर्वेक्षण विभागाने दिला होता. त्यामुळे याठिकाणी विमानतळ सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.