Grapes Day: द्राक्ष दिनाच्या पेटंटला केंद्र सरकारची मंजुरी

महाशिवरात्रीला साजरा होणार; शेतकरी आनंदित, द्राक्ष विक्रीला मिळणार चालना
Grapes
GrapesPudhari
Published on
Updated on
संतोष सिरसट

उत्तर सोलापूर : आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवस-दिन साजरे केले जातात. ज्याप्रमाणे 21 जूनला योग दिन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आता यापुढे प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला द्राक्ष दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या पेटंटला भारत सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या द्राक्ष दिनामुळे द्राक्ष विक्रीला चालना मिळणार आहे.

तासगाव येथील ‌‘यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोडूसर कंपनी‌’तर्फे महाशिवरात्रीला द्राक्ष दिन साजरा करण्यास पेटंट मिळावे याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे आता महाशिवरात्रीला द्राक्ष दिन साजरा केला जाणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी ‌‘द्राक्ष दिन‌’ साजरा करण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाला आता भारत सरकारकडून पेटंट मान्यता मिळाली आहे. भविष्यात हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा करण्याचा संकल्प यश द्राक्ष नगरी कंपनीने केला आहे.

भगवान शंकराला रुद्राक्ष अत्यंत प्रिय मानले जाते. ‌‘रुद्राक्षातील ‌‘रु‌’ काढले तर द्राक्ष‌’ अशी भावनिक व श्रद्धापूर्ण संकल्पना मांडत, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला द्राक्ष अर्पण करणे, पिंडीवर वाहणे आणि प्रसाद म्हणून द्राक्ष सेवन करणे हे अत्यंत शुभ मानले जाते.

महाशिवरात्रीच्या कालावधीत द्राक्षांचा हंगाम अत्यंत जोमात असतो. बाजारात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उपलब्ध असतात. त्यामुळे या दिवशी देशभरात द्राक्ष सेवन आणि द्राक्ष अर्पणाची परंपरा वाढल्यास द्राक्ष विक्रीला मोठी चालना मिळू शकते. याचा थेट फायदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून, त्यांच्या द्राक्षांना चांगला दर मिळण्यास मदत होईल.

भारताच्या कानाकोपऱ्यात भगवान शंकराची मंदिरे आहेत. कन्याकुमारीपासून कैलास पर्वतापर्यंत प्रत्येक गावात महादेव मंदिर आढळते. जर प्रत्येक मंदिरात भगवान शंकराला नैवेद्य म्हणून थोडी-थोडी द्राक्ष अर्पण केली गेली आणि प्रसाद म्हणून जनतेने द्राक्ष सेवन केली, तर एका दिवसात प्रचंड प्रमाणात द्राक्षांची मागणी निर्माण होऊ शकते.

सध्या देशात अंदाजे 32 लाख टन द्राक्ष उत्पादन घेतले जाते. परंतु जर प्रत्येक व्यक्तीने केवळ 200 ग्रॅम द्राक्ष सेवन केली, तर एका दिवसासाठीच कोट्यवधी टन द्राक्षांची गरज निर्माण होऊ शकते. त्यामुळे द्राक्ष शेतीच्या विस्ताराला आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला मोठी चालना मिळू शकते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला द्राक्ष अर्पण करून, प्रसाद म्हणून द्राक्ष सेवन करून आणि या उपक्रमाचा प्रचार करून आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news