

सोलापूर : जिल्हा परिषदेकडे निधी शिल्लक असतानाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न काढल्याने जिल्ह्यातील एक हजार 982 कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात असल्याचा आरोप जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केले आहे.
जिल्ह्यात 1029 ग्रामपंचायत मध्ये विविध पदावर कार्यरत असणाऱ्या एक हजार 982 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाकडून 75 व 100 टक्के वेतन वसुलीच्या प्रमाणात देण्यात येते. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीत वेळेत व्हावे, यासाठी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील वेतनासाठी लागणारा चार कोटी 23 लाख 87 हजार 412 रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या खात्यावर 14 ऑक्टोबरला शासनाने जमा केला आहे. मात्र, त्यानंतरही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर जमा करण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेकडून एकीकडे ठेकेदार आणि इतर कामांची बिले काढण्यासाठी धडपड सुरू असून, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्याचे वेतन पंचायत समितीला वर्ग करणे विसरुन गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार 982 ग्रामपंचायत कर्मचारी व त्याच्या कुटुंबावर ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी पंधरा हजार रसानुग्रह अनुदान, 23 महिन्याचा कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी देण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
परंतु, दिलेल्या आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीकडून ऐन दिवाळीसाख्या महत्त्वाच्या सणात कोणतीही आर्थिक मदत करण्यात आली नाही. गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आणल्याचा दावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतून होत आहे.