Jishnu Dev Varma: एआय साक्षर बना

राज्यपाल जिष्णु देव वर्मा : सोलापूर विद्यापीठ दीक्षांत सोहळा
Jishnu Dev Varma: एआय साक्षर बना
Published on
Updated on

सोलापूर : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही. त्यासोबत संवाद कौशल्ये, डिजिटल व एआय साक्षरता, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, नेतृत्व, सांघिक कार्य आणि मजबूत नैतिक मूल्येही तितकीच महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांना मानद डी. एस्सी. तर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना मानद डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली. पदवीप्रदान समारंभात ११ हजार ८८१ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे, १६२ स्नातकांना पीएचडी आणि ५७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येत आहेत. ४४ विद्यार्थिनींनी सुवर्ण पदक पटकावली आहेत.

राज्यपाल वर्मा पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी जिज्ञासू राहावे. स्वतंत्र विचार करावा. उद्योजकतेचा स्वीकार करावा आणि आयुष्यभर शिक्षण घेत राहावे. शिक्षणातील मुलींचे यश हे वाढत्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याबद्दल समाधान वाटते.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करून विद्यापीठाच्या उपक्रमांची, यशाची माहिती दिली. विद्यापीठाने आजच्या काळाशी सुसंगत वैज्ञानिक, तांत्रिक अभ्यासक्रम सुरू केल्याचे ते म्हणाले. यावेळी विद्यापीठाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी दीक्षांत मिरवणूक निघाली. परीक्षा नियंत्रक श्रीकांत अंधारे ज्ञानदंड हाती घेऊन अग्रभागी होते. यावेळी विद्यापीठाच्या उद्यम इन्क्यूबेशन सेंटरमार्फत स्टार्टअप प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांनी केली.

सोलापूर यात्रेतील बाराबंदीचा गौरव

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाविकांचा पेहराव बाराबंदी आहे. या पोशाखाचा गौरव करणारा पोशाख दीक्षांत सोहळ्यात अभिमानाने घातला जातो. डोक्यावर पांढराशुभ्र पटका, शुभ्र घोळदार बाराबंदी, गळ्यात उपरणे असा पेहराव राज्यपाल, कुलगुरू, विद्यापीठ अधिकारी, डीन व दीक्षांत सोहळ्यातील विद्यार्थ्यांनी परिधान केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news