

पंढरपूर/सोलापूर : सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिव जिल्ह्यांसाठी वरदायिनी असणारे उजनी धरण आज (बुधवारी) शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी रात्री हे 117 टीएमसीचे धरण 98 टक्के भरले. आता एक-दोन दिवसांत हे धरण शंभर टक्के भरेल. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे. याबरोबरच उद्योगासाठी लागणार्या पाण्याचाही प्रश्न आता भेडसावणार नाही.
यंदाच्या उन्हाळ्यात धरणाच्या पातळीने तळ गाठला होता. धरण उणे साठ्यापर्यंत गेले होते. यामुळे सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर झाला होता. उन्हाळ्यात सोलापूरकरांना तब्बल आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळत होते. अन्य छोट्या-मोठ्या गावच्या पाणी योजनाही कोरड्या पडल्या होत्या. तशीच अवस्था शेतीसाठीच्या पाण्याची झाली होती. परंतु, यंदा पावसाने कृपा करत मे महिन्यापासूनच धो धो बरसण्याच सुरुवात केली. कधी नव्हे तो जून आणि जुलै महिन्यात सोलापूर जिल्ह्यात चक्क पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झाली होती.
ज्या काळात सोलापूर जिल्ह्याचे पावसाकडे डोळे लागलेले असायचे त्या काळात चक्क पुरेसा पाऊस होऊन धरणातही पुरेसा पाणीसाठा झाल्याने यंदा पाऊसमान चांगले असल्याची वार्ता पसरली. दरम्यान, पुणे परिसरातील उजनी धरणाच्या कॅचमेंट परिसरात चांगला पाऊस झाला. उजनी धरणावरील अन्य छोट्या छोट्या धरणांमध्येही यामुळे बराच पाणीसाठा झाला. तेथून उजनी धरणात मोठ्याप्रमाणात पाणीसाठा आला. त्यामुळे धरण यंदा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात शंभरीकडे वाटचाल करत आहे.
उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर शहर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, माढा पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. धरण शंभर टक्के भरल्यानंतर जादा पाणीसाठा भीमा नदीपात्रात सोडण्यात येतो. सध्या उजनी धरण कॅचमेंट भागातील पाऊस थांबला आहे.
विशेष तपशील...
- उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग पाच हजार 226 क्युसेक
- धरणातून कालव्याव्दारे 1400 क्युसेक विसर्ग
- बोगद्याव्दारे 400 क्युसेकचा विसर्ग
- कालव्याव्दारे पाणी सोडण्यात आले
- भीमा नदीकडील विसर्ग बंद करण्यात आला