

सोलापूर : दिवाळीत सोलापुरातील सोने-चांदीच्या बाजारात दर घसरले आहेत. व्यापारी व ग्राहक या दोघांनाही किंचित दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत जाणारा सोन्यांचा वाढत्या तोराला आळा बसला असला, तरी बाजारात मात्र उठाव नसल्याचे सराफ व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शुक्रवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी शहरातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,23,500 (जीएसटी वगळून) इतका होता. जो मागील दरापेक्षा सुमारे पाच ते सहा हजारांनी कमी आहे. दिवाळी सणापुर्वी चांदी प्रति किलो 1 लाख 75 हजारांच्या घरात भाव होता. तो दिवाळीच्या शेवटच्या दिवशी 1 लाख 50 हजार (जीएसटी वगळून ) भाव खाली आला होता.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर्सचा भाव वाढल्यामुळे आणि गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्यामुळे सोनं-चांदीच्या किमतींवर दबाव आला आहे. त्याचबरोबर, सणासुदीनंतर खरेदीत आलेल्या थोड्याशा मंदीमुळेही स्थानिक बाजारात दर खाली आले आहेत.
सोलापूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष देवरमनी यांनी सागितले, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या काळात मोठी खरेदी झाली. आता लोक थोडा वेळ थांबून पुढील दरांचा अंदाज घेत आहेत. दर आणखी थोडे कमी झाल्यास बाजारात पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.दरांमध्ये झालेल्या घटीमुळे गुंतवणूकदार आणि दागिने खरेदीदारांसाठी ही अनुकूल वेळ मानली जात आहे. मात्र पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि डॉलर इंडेक्सवरून दराचा पुढील कल निश्चित होईल. सध्या तरी सोलापूरमध्ये सोनं-चांदीचे दर घटले असल्याने बाजारात थंडाव्याचा माहोल आहे.