

सोलापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या चढ-उताराचा थेट परिणाम सोलापूर शहरातील सोने व्यापारावर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या मजबुतीमुळे आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याचे भाववाढ होत आहे. सोन्याचा तोरा वाढलेला असतानादेखील दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात तोबा गर्दी आहे. तयार दागिने घेण्यापेक्षा शुध्द सोने घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. सोन्यापेेक्षा चांदीला मोठी मागणी वाढली असल्याने चांदीचा सराफ बाजारात मोठा तुुटवडा आहे.
शहरातील सराफ व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील आठवड्यात सोन्याचा भाव कमी जास्त होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला 1 लाखांच्या आसपास असलेला भाव दिवाळीसणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा तोरा अचानक वाढला आहे. शुक्रवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी प्रति तोळा 1 लाख 34 हजार 650 रुपये भाव होता. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी थोडे थांबून पाहण्याचे धोरण स्वीकारत आहेत. तरीदेखील सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र गेल्या महिन्याच्या तुलनेत या आठवड्यात सोने व्यवहारात सुमारे 15 टक्क्यांनी घट झाल्याचे सराफ व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे दर दिवसेंदिवस बदलत आहेत. डॉलर-रुपया दर आणि मध्यपूर्वेतील तणाव यामुळे सोने- चांदी भावात चढ-उतार सुरू आहे. सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने बाजार पुन्हा तेजीत येईल, अशी अपेक्षा सराफ व्यापाऱ्यांना आहे.
चांदी तीन लाखांवर जाणार?
सोलापूर शहरात सध्या चांदीचा भाव 1 लाख 70 हजार प्रति किलो आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात चांदीचा तुटवडा आहे. तरीदेखील ग्राहकांचा सोन्यापेक्षा चांदी खरेदीकडे कल आहे. त्यामुळे सोन्यापेक्षा चांदीचा भाव तीन लाखांच्यावर जाण्याची शक्यता आहे.