

निमगाव : निमगाव म. (ता. माळशिरस) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत निमगाव व परिसरातील शेतकर्यांनी आर्थिक अडचणीमुळे बँकेच्या सोनारामार्फत बँकेत सोने तारण ठेवून कर्जाऊ रक्कम ही शेतकर्यांनी उचलली होती. वर्षानंतर शेतकरी बँकेत पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर ज्या नोंदी होत्या, त्याप्रमाणे सोने नव्हते. सोने बदललेले आढळून आले. त्यामुळेच गावात एकच खळबळ उडाली.
फसवणूक झालेल्या 27 लोकांनी जिल्हा बँकेच्या प्रशासकांकडे बनावट सोन्याबाबत तक्रार केली असून आम्ही आमच्या सोन्याची रक्कम भरण्यास तयार असून आमचे शुद्ध सोने बँकेने द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून बँकेच्या अधिकृत सोनाराचा संपर्क होत नाही. त्यामुळे गावात सोनाराच्या बाराभानगडीवर ग्रामस्थ चौकाचौकात चर्चा करीत आहेत. ग्राहक व सोनार या दोघांनी मिळून सोने बँकेकडे ठेवले आहे.
सोने तारण कर्जाची पडताळणी मुख्य कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये काही सोने बनावट आढळून आले. साधारणतः 29 लाख रूपयांची बँकेची फसवणूक झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले असल्याचे बँकेचे शाखाधिकारी आलीमखान पठाण यांनी सांगितले.