

सोलापूर : राज्यात हिंदी विषय लागू करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला होता. मंत्रिमंडळात निर्णय झाले होते, त्यांच्या सह्या आहेत. परंतु आता ते हिंदी विषय सक्ती करण्याच्या मु्द्यावरून पलटी मारत असून उद्धव ठाकरे हे पलटी बहाद्दर आहेत, त्यांचे वागणे हे बालिशेपणाचे आहे, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे शुक्रवारी सोलापूरच्या दौर्यावर होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना राजकारणावर भाष्य केले. यापूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पुढचे पंतप्रधान होतील असे म्हटले होते. आता ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असेही घोषणा करू शकतील, शब्दात चिमटा काढले.
शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करताना कुठलीही बळजबरी केल्या जाणार नाहीत. सर्व लोकप्रतिनिधी, लोकनेते, बाधित शेतकरी यांना विश्वासात घेऊन आम्ही मार्ग तयार करण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे. राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांना महायुती ही एकत्रितपणे गुण्या गोविंदाने नांदत आहेत हे पाहवत नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य आहेत. त्यांना वाटते की आम्ही रोज भांडले पाहिजे, परंतु आम्ही सोबत मिळून काम करत असतो, असे गिरीश महाजन म्हणाले. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर लोकांचा किती विश्वास आहे, प्रभाव किती आहे हे दिसून येईलच. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व बाजूला सोडून राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेसच्या मांडीला मांडे घालून बसले ते मुख्यमंत्रीपदाच्या सुखासाठी स्वतःचे राजकीय अंधकारमय करून घेतले आहे, असेही महाजन म्हणाले.
संजय राऊत हे रोज सुधाकर बडगुजर यांच्या घरी जाऊन जेवणखान करायचे. त्या वेळी ते मान्य होते. ते सोडून गेले की मग ते एकदम नालायक झाले. मामा राजवाडे यांना चार दिवसांपूर्वी अध्यक्ष केले, त्यांनी आम्हाला विचारणा केल्यावर त्यांना काढून टाकण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पार्टी बिना अध्यक्षांची ठेवावी, असा सल्ला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंना दिला.
संजय राऊत यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा महापालिकेला निकाल दाखवावेत. महापालिकेचा निकाल लागल्यानंतर त्यांची संख्या किती येते, याचे आश्चर्य वाटेल. त्यांचे मागचे पुढचे सर्व रेकॉर्ड तुटतील. आम्ही कोणाचे गुन्हे घेतो आणि गुन्हे दाखल करतो, हा आमचा उद्योग नाही. त्यांच्याकडून आमच्याकडे यायला लागले की आरोप करतात. ठाकरे गटाने आधी शिंदेंना काढले, त्यानंतर राजवाडे यांनाही काढले. असेही महाजन म्हणाले.
मी 35 वर्षांपासून आमदार आहे. माझी एखादी गुंड टोळी सांगा, माझी एखादी खंडणीचे प्रकरण सांगा, वसुलीची एखादी तरी गोष्ट सांगा. त्यांनी चार्ट लवकर द्यावा. एकनाथ खडसे त्यांना मदत करणार होते. बाष्कळ बडबड करू नका, पुराव्यानिशी काहीतरी बोला. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, असे बोलण्यात काही अर्थ नाही. खडसेंनीही अशीच बाष्कळ बडबड केली होती. माझ्याकडे सीडी आहे, उगीच मोबाईल काढतात, कुठेतरी होती असं सांगतात. हा काय प्रकार आहे, हवेत गोळीबार करायची, बाष्कळ बडबड करायची हा त्यांचा उद्योगच आहे, अशा शब्दात खा. राऊत आणि एकनाथ खडसे यांचा मंत्री महाजन यांनी समाचार घेतला.