

सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदर मातांची संख्या मोठी आहे. गेल्या गुरुवारी येथे एक कहरच झाला. चक्क जन्म झालेल्या बाळाचीच अदलाबदल झाल्याची घटना नुकताच समोर आली आहे. येथील प्रसूती विभागात बाळाची अदलाबदल झाल्याचा आरोप करीत संबंधित प्रसूती विभागातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी. जन्मलेल्या बाळाची आनुवंशिक तपासणी व्हावी, अशी मागणी प्रसूत झालेल्या महिलेच्या पतीने केली आहे.
गेल्या गुरुवारी (दि. 23) रोजी येथील शासकीय रुग्णालयात तक्रारदार माणिक यांच्या पत्नीला प्रसूती विभागात दाखल करण्यात आले. या महिलेला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू झाल्या. मग येथील प्रसूती विभागात त्यांची पहाटे प्रसूती झाली. प्रसूतीनंतर नातेवाईकांना अडीच तास बाळ दाखवले नाहीत. मग, नातेवाइकांनी विचारणा केल्यावर तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी तुमचे बाळ बाल विभागात पाठवल्याचे सांगितले. नातेवाईकांना दुसऱ्या विभागात नेऊन बाळ दाखवले. आईकडे बाळ उशिरा का सुपूर्द केले, असे नातेवाइकांची तक्रार आहे.
बाळ उशिरा दाखवल्याने शंका
प्रसूतीनंतर बाळ उशिरा दाखवल्याने नातेवाइकांच्या मनात शंका निर्माण झाली. प्रसूती झालेल्या महिलेच्या हातावर 520 नंबरचा क्रमांक होता. तर बाळाच्या हातावरील शिक्क्यावर 521 नंबर लिहिला होता. म्हणून, पती माणिक यांना शंका आली होती. पुन्हा ही बाब बाळाला रात्री औषध देण्यासाठी आलेल्या सिस्टरमुळे समोर आली. पुन्हा त्या बाळाच्या हातावरील नंबर बदलून 521 ऐवजी 520 करून दुसरे लेबल लावले, अशी लेखी तक्रार प्रसूत महिलेचे पती माणिक यांनी दिली आहे.