

द.सोलापूर : उन्हाचा तडाखा वाढत असताना पोहण्यासाठी गेलेल्या एका १० वर्षीय विद्यार्थ्याचा दगड खाणीत पाण्यात बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना १२ मार्च २०२६ रोजी दुपारी दक्षिण सोलापूर तालुक्यात घडली. कासेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीत शिकणारा यशराज हरी हब्बू हा गंगेवाडी येथील बंद पडलेल्या दगड खाणीत पोहायला गेला होता. यानंतर थोड्या वेळाने तो पाण्यात दिसेनासा झाला असून रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी शाळा सुटल्यानंतर दुपारी सुमारे एकच्या सुमारास यशराज आपल्या काही मित्रांसोबत गंगेवाडी येथील भरपूर पाण्याने भरलेल्या बंद पडलेल्या दगड खाणीवर गेला होता. खाणीत मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले असून ते सुमारे ७० ते ८० फूट खोल असल्याचे सांगितले जाते. पाण्यात उतरताना अंदाज चुकल्याने आणि पोहता न आल्याने यश खोल पाण्यात गेला आणि काही क्षणांतच पाण्यात दिसेनासा झाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करत गावकऱ्यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सोलापूर अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले.
शोधकार्यात सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, हेड कॉन्स्टेबल रशीद बानेवाले, सर्कल माळी, आरिफ हुडीवाले, तसेच कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, उपसरपंच व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. खाण अतिशय खोल असल्याने आणि सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे १२ मार्चच्या रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही यशचा पत्ता लागला नाही. दरम्यान, आज १३ मार्च २०२६ रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असून प्रशासन व बचाव पथकाकडून पाण्यात शोधकार्य सुरू आहे. या घटनेमुळे कासेगाव परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गंगेवाडी येथील दगड खाणीत बेपत्ता झालेल्या बालकाच्या शोधासाठी अग्निशमन दलाचे पथक पाण्यात उतरून शोधमोहीम राबवत आहेत.मात्र घटनास्थळी अंडरवॉटर कॅमेरा उपलब्ध नसल्यामुळे शोधकार्य सध्या ठप्प आहे. दरम्यान, अंडरवॉटर कॅमेरा लवकरच घटनास्थळी पोहोचणार असून तो आल्यानंतर पाण्यातील शोधमोहीम अधिक वेगाने आणि प्रभावीपणे सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.