

सोलापूर : यंदा १२ दिवसांचा गणेशोत्सव असून त्याची सुरुवात सोमवारी घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेने होईल. त्यासाठी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून ५१ मिनिटांपर्यंत स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नसल्याचे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतरदेखील करता येईल, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
सोमवारी हरितालिका तृतीया व श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आहे. यादिवशी तृतीया समाप्ती सकाळी सात वाजून सात मिनिटांनी आहे. हरितालिका तृतीयेसाठी सूर्योदयव्यापिनी तृतीया आवश्यक असते, तर गणेश चतुर्थीकरिता चतुर्थी तिथी मध्यान्हकाल व्यापिनी असावी लागते. १४ सप्टेंबर रोजी सूर्योदयकाली तृतीया व मध्यान्ही चतुर्थी असल्याने ही दोन्हीही व्रते एकाच दिवशी आहेत. तिथीचे सूर्योदयकाली असणे, मध्यान्हकाली असणे इत्यादी नियम व्रताच्या दिननिश्चितीकरिता आहेत.
२५ सप्टेंबरला विसर्जन
२५ सप्टेंबर रोजी शुक्रवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासूनचा १२ वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते, त्यांच्याकडे १२ दिवसांचा उत्सव असेल.