

सोलापूर : औसातील नाथ संस्थानचे अध्यक्ष तसेच तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून देण्यात येणारा कीर्तन समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत या पुरस्काराची घोषणा केली. तीन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाथ संस्थांनची पाच पिढ्यांपासूनची कीर्तनाची परंपरा आहे. सध्याचे पीठाधिपती गुरुबाबा व गहिनीनाथ महाराज औसेकर ती परंपरा पुढे नेत आहेत. तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून गहिनीनाथ महाराज औसेकर हे गेल्या 18 वर्षांपासून वारकऱ्यांची, विठ्ठल भक्तांची सेवा करत आहेत.