बार्शी : एका अनोळखी इसमाने किराणा दुकानदाराला 200 गोण्या साखरेचा माल कमी किंमतीत देतो असे म्हणुन 3 लाख रूपये घेऊन पसार झाला.
संताजी जाधव (वय 45, रा. आगळगाव) यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 25 जुलै रोजी 11.30 च्या सुमारास बार्शी एस.टी, स्टॅण्डवर एक अनोळखी इसम फोनवर साखर विकण्याबद्दल बोलत होता. त्यावेळी घरासाठी व दुकानासाठी एक दोन पोती स्वस्तामध्ये मिळतील का असे त्यास विचारले असता त्याने संमती देऊन टिळक पुतळ्याजवळ बोलवून घेतले. कमी किमतीत साखरेचे चार गोण्या दिल्या.
त्यानंतर वारंवार फोन करून माझ्याकडे अजुन 200 गोण्या साखरेचा माल आहे. तुम्ही पैशाची तजविज करून या तुम्हाला त्यात एखादा लाख फायदा होईल असे सांगीतले. दि. 5 सप्टेंबररोजी रोजी रात्री तो इसमाने गावी आगळगाव येथे घरी येऊन माल खरेदी करा असे सांगितले. त्यानंतर दि. 8 सप्टेंबर रोजी त्या अनोळखी इसमाने फोन करुन माल भरण्यासाठी गाडी मिळत नाही तुम्ही गाडी घेवून या असे सांगीतल्याने ते मार्केट यार्ड बार्शी येथून ओळखीचा टेम्पो घेऊन आले. अनोळखी इसमाला 3 लाख रुपये दिले. साखरेला मुंगळे लागू नये म्हणून औषध आणतो म्हणून गेलेला तो इसम पैसे घेऊन पसार झाला.

