

सोलापूर : सोलापूर शहरात शुक्रवारी (दि.२७) विविध भागात चौघांनी गळफास घेत जीवन संपवले. या कृत्यामागील चौघांपैकी एकाचेही कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, गत काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात असे प्रकार वाढत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
पहिल्या घटनेत शहरातील जोडभावी पेठ येथील एस. के. बार जवळ राहत असलेल्या युवराज श्याम जिंदम (वय २६, रा. जोडभावी पेठ) याने अज्ञात कारणावरुन घरातील सिलिंग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवले. दुसर्या घटनेत पत्रकार भवन येथील वॉटर फ्रंट अपार्टमेंट येथे राहुल बाबुराव संगेपाग (वय ३५, रा. वॉटर फ्रंट अपार्टमेंट, पत्रकार भवन) यांनी घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवले. तिसर्या घटनेत विनायक नगर येथील अंबादास शेखर येलदंडी (वय 28, रा. विनायक नगर) याने अज्ञात कारणावरून दोरीच्या साह्याने पत्राच्या अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले. तर चौथ्या घटनेत विडी घरकुल कुंभारी येथील अंबिका रमेश कोतापल्ली या २८ वर्षीय तरुणीने घरातील छताच्या फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात झाली आहे.