Tamlwadi MIDC | तामलवाडी एमआयडीसीत होणार चार क्लस्टर

सोलापुरात बैठक : 30 कोटींवर 95 टक्के अनुदान, इन्फ्रास्ट्रक्चरसाठीही 10 कोटी
Tamlwadi MIDC |
सोलापूर : तामलवाडी एमआयडीसीबाबत उद्योजकांच्या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना आ. राणा जगजितसिंह पाटील.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूरपासून अवघ्या 20 किलोमीटरवर तामलवाडी (ता. तुळजापूर) येथे होणार्‍या एमआयडीसीत चार वेगवेगळे क्लस्टर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक क्लस्टरच्या सामूहिक सुविधांसाठी केंद्र शासनाकडून 30 कोटी रुपयांची योजना आहे. त्यामध्ये 95 टक्के अनुदान मिळणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी शंभर टक्के अनुदानावर 10 कोटी रुपये मिळतील, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.

सोलापूर-तुळजापूर महामार्गालगत तामलवाडी हद्दीत नव्याने एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. या एमआयडीसीत सोलापुरातील उद्योजकांनी गुंतवणूक करावी यासाठी गुरूवारी (दि. 15) डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात बैठक झाली. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक घोडके, धाराशिवच्या प्रांताधिकारी अरुणा गायकवाड, एमआयडीचे लातूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक अमित भांबरे, तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक निखील पाटील, वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अर्जुन गोरे, उद्योजक किशोर कटारे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम उपस्थित होते.

यावेळी आमदार पाटील यांनी तामलवाडी एमआयडीसीत मिळणार्‍या सवलती, इन्फ्रास्ट्रक्चर, पाण्याची व वीजेची उपलब्धता, कामगारांची राहण्याची सोय याबाबत सविस्तर माहिती दिली. तामलवाडी एमआयडीसीत चार क्लस्टर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. गारमेंट, महिला, कृषी प्रक्रिया आणि एस.सी एस.टी साठी एक असे चार क्लस्टर करता येतील. प्रत्येक क्लस्टरसाठी केंद्र शासनाकडून सामूहिक सुविधांसाठी 30 कोटी रूपये मिळू शकतात. त्यामध्ये तब्बल 95 टक्के अनुदान मिळेल. प्रत्येक क्लस्टरला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 100 टक्के अनुदानावर 10 कोटी रूपये मिळू शकतात असे त्यांनी सांगितले. सोलापुरातील उद्योजकांनी तामलवाडी एमआयडीसीत गुंतवणूक करावी, त्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.

दरम्यान, उद्योजक किशोर कटारे यांनी एमआयडीसी पूर्णपणे यशस्वी होणार असल्याचे सांगितले. कामगारांची कमतरता भासणार नाही. एमआयडीसीने जास्तीत जास्त सुविधा येथे पुरवाव्यात अशी मागणी त्यांनी केली.

चेंबरचे अध्यक्ष राजू राठी यांनी रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, कामगारांसाठी घरे, पाणी आणि वीजेची उपलब्धता करण्याबाबत सूचना केली. सोलापुरात कोल्ड स्टोअरेजची कमतरता आहे. ते येथे होवू शकतात तसेच पॉवरलूम, स्पिनींग मिल, गारमेंट उद्योगांना इथे वाव असल्याचे सांगितले. यावेळी इतर उद्योजकांनी एमआयडीसीतील सवलती, भूसंपादन, वीजेची उपलब्धता याबाबत प्रश्न विचारले. एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र, वस्त्रोद्योग विभागाने स्लाईड शोव्दारे उद्योजकांना माहिती दिली. यावेळी सोलापुरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

म्हाळुंब्रा येथे अ‍ॅग्रो इंडस्ट्री

तुळजापूर तालुक्यातील म्हाळुंब्रा येथे तुळजाभवानी देवस्थानची एक हजार 200 एकर जमीन आहे. या जमिनीवर अ‍ॅग्रो इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे. डाळींब, केळी, बेदाणे, कांदा यासह इतर कृषी उत्पादनासाठी दोन लाख टनाचे कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येणार आहे. या जागेतूनच रेल्वे ट्रॅक गेला आहे. तेथे स्टेशनही होणार आहे. याचबरोबर अनेक फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्यात येणार आहेत. सोलापुरात दाळ मिलही उभारण्याचा मानस असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news