

पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा
मोहोळ विधानसभेसाठी माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र त्यानंतर अनपेक्षित घडामोडी घडत त्यांची उमेदवारी रद्द करून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर सिद्धी कदम व रमेश कदम यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती मात्र अर्ज माघार घेण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार रमेश कदम यांनी मोहोळ येथील तहसील कार्यालयात स्वतः येऊन तर सिद्धी कदम यांची प्रतिनिधीमार्फत उमेदवारी मागे घेतली आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात शेवटच्या दोन दिवसांमध्ये अनापेक्षितपणे खासदार शरदचंद्र पवार यांनी धमाका उडवून देत माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना दि. २७ रोजी उमेदवारी दिली होती. त्यानंतर मोहोळ तालुका संघर्ष समिती व विधानसभा मतदारसंघातील काही नेतेमंडळींनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करून राजू खरे यांना उमेदवारी मिळविली. त्यानंतर माजी आमदार रमेश कदम व त्यांच्या कन्या सिद्धी कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जाबाबत मतदार संघात वेगवेगळ्या चर्चा केल्या जात असताना त्यांनी सोमवारी स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर येऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तर प्रतिनिधीमार्फत सिद्धी कदम यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे आता मोहोळ विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणकोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
खा. शरद पवार व पार्टीने वयाच्या २६ व्या वर्षी माझ्या मुलीला उमेदवारी दिली. त्या उमेदवारीची महाराष्ट्रभर चर्चा झाली. दुर्दैवाने ती उमेदवारी राहिली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. कार्यकर्त्यांची आग्रहाची भूमिका अपक्ष लढविण्याबाबत होती. त्यामुळे माझा व सिद्धी कदम हिचा अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु ज्या पार्टीने संधी दिली त्या पार्टीच्या ध्येयधोरणांशी बांधील राहून काम केले पाहिजे अशी भूमिका घेऊन दोन्ही अपक्ष अर्ज आज मागे घेतले आहेत. कार्यकर्त्यांच्या विचार विनिमयानंतर पुढील भूमिका ठरवणार असल्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितले.
दरम्यान मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुक असलेले संजय क्षीरसागर यांनी आपली अपक्ष उमेदवारी ठेवल्याने मोहोळ विधानसभा मतदार संघाची ही निवडणूक विद्यमान आमदार यशवंत माने, महाविकास आघाडीचे राजू खरे व अपक्ष संजय क्षीरसागर यांच्यात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.