सोलापूर : माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात एका 45 वर्षीय महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. ज्या व्हिडीओच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला, तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सपाटे हे अश्लील चाळे करताना दिसत आहेत. परंतु हा व्हिडीओ खरा की खोटा याची पुष्टी होऊ शकली नाही.
माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पीडित महिलेने स्टिंग ऑपरेशन केले. ही पीडित महिला पुण्याहून सोलापूरला शेतीच्या कामासाठी आली होती. हॉटेल शिवपार्वती लॉज येथे राहात असताना सपाटे यांनी त्या महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. शिवपार्वती लॉज येथे असताना विनयभंग केला, त्यानंतर त्या महिलेने स्टिंग ऑपरेशन करून व्हिडीओ काढला आणि त्या आधारे फौजदार चावडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. हा व्हिडीओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खरा की खोटा याची पुष्टी होऊ शकली नाही. परंतु व्हिडीओतील चित्रणावरून मनोहर सपाटे हे अश्लील चाळे करताना दिसत आहेत. अत्यंत घाणेरड्या प्रकारचा हा व्हिडीओ असल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे.
व्हिडीओ व्हारयल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकारणातील एका ज्येष्ठ नेत्याच्या हरकती पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान फौजदार चावडी पोलिसांनी याबाबत सपाटे यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावणार असल्याचे सांगितले.

