

करमाळा : करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय धक्कातंत्र वापरत मुंबई येथील मुक्तागिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. त्याचबरोबर जगताप यांच्या प्रवेशाने तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.
प्रवेशावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेचे करमाळा-माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर उपस्थित होते. माजी आमदार जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जगताप दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते. 1990 साली अपक्ष तर 2004 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते आमदार झाले होते.
2019 साली विधानसभेला संजयमामा शिंदे यांना विजयी करण्यात व 2024 साली नारायण पाटील यांना विजयी करण्यात जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. जगताप यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक देशभक्त स्व. नामदेवराव जगताप चार वेळा व चूलते स्व. अण्णासाहेब जगताप एक वेळेस आमदार होते. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा लाभ होणार आहे. लवकरच करमाळा येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.