

मंगळवेढा : अन्न सुरक्षा व मानके कायदा विभागाकडून गुरुवारी मंगळवेढ्यात अचानक खाद्यपदार्थ उत्पादक, सहविक्रेते, हॉटेल, बेकरी व्यवसाय, नाश्ता सेंटर याठिकाणी जाऊन त्यांच्या पदार्थांची नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. यामुळे अशा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील अन्नपदार्थ व स्वीट मिठाई बनवणार्या विक्रेत्यांच्या दुकानातील पदार्थ हे कुठल्या गुणवत्तेचे असतात, याची अन्न सुरक्षा व मानके कायदा विभागाने तपासणी व कार्यवाही करावी, अशा आशयाची बातमी दैनिक ‘पुढारी’ मध्ये रविवारी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन कारवाई सुरू केली आहे.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक मिठाईसह अन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. त्याला मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी जास्त प्रमाणात पदार्थ बनवले जातात. मात्र, त्याला वेळमर्यादा असते. ठराविक कालावधीत उत्पादन विक्री न झाल्यास ते खराब होतात. याकडे विक्रेते व गिर्हाईकही कानाडोळा करतात. अशात ते आहारात आल्यास अन्न बाधा होऊ शकते. परिणामी आजार वाढतात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र दुर्गंधी पसरली जाते. त्यामुळे माशा वाढतात. त्या माशा खाद्यपदार्थ विक्री व उत्पादन निर्मिती ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे तिथे आवश्यक काळजी न घेतल्याने त्या पदार्थांवर माशा रेंगाळतात व रोगराई पसरू शकते, म्हणून संबंधित विभागाने सातत्याने या संदर्भात माहिती व नमुने गोळा करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या गेल्या पाहिजेत.
मंगळवेढा तालुक्यात स्वीट मार्ट व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. ग्रामीण भागातदेखील या पदार्थांना मोठी मागणी असते. याच्या मागणीचा विचार करता यासाठी लागणार्या दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती दुधापासून केली जाते की कृत्रिम बनावट दुग्धजन्य घटक वापरले जातात, याची तपासणी केली पाहिजे.
गुरुवारी दुपारी अन्न सुरक्षा मानके विभागाच्या अधिकार्यांनी मंगळवेढा शहरातील 6 ठिकाणी तपासणी करून काही पदार्थांचे नमुने घेतले आहेत. या विभागाचे अधिकारी आलेले समजताच काही विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. तर काही पानटपरी धारकांनी दिवसभर आपल्या टपर्या बंद ठेवल्या. मंगळवेढा तालुक्यात ग्रामीण भागातदेखील मिठाई खाद्यपदार्थ विक्री दुकाने मोठ्या संख्येने सुरू आहेत. ग्रामीण भागात या कायद्याच्या अंतर्गत असणार्या नियमाची अंमलबजावणी होत नाही. तसेच अनेकांना याचे ज्ञान नाही. यात ग्राहकांचेदेखील याबाबत अज्ञान दिसून येत आहे. ग्राहकांनी आपल्या आहारात समाविष्ट असणार्या अन्नपदार्थ आणि खाद्यपदार्थ यांचा दर्जा गुणवत्ता समजून घ्यावी. जर काही संशय किंवा त्याबाबत तक्रार असेल तर अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत आमच्या विभागाकडे लेखी तक्रार करावी. अशावेळी तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.