

माळशिरस : आजीकडे गेलेल्या पाच वर्षाच्या चिमुकल्याचा आपल्या गावाकडे मोटारसायकलवरुन परतताना मोटारसायकलला पाठीमागून चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पाच वर्षाचा चिमुकला खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला तर त्याची आजी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार, दि. 5 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुणे-पंढरपूर मार्गावर हॉटेल पंचशील समोर घडली आहे. अविष जाधव (वय 5) रा. मगराचे निमगाव, तालुका माळशिरस तर उज्वला बाळासाहेब मगर (वय 55) गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिलीप शरद माने रा. कुरवली (ता. इंदापूर) हे मोटारसायकल क्रमांक (एम. एच. 45 एक्स 3290) यावरून कुरवलीकडुन निमगांवकडे निघाले होते. त्या बाळाला तहान लागल्याने ते पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते. यानंतर ते निघताना काही अंतरावर आल्यानंतर नातेपुतेकडून माळशिरसकडे येणार्या चारचाकी कार नंबर (एम. एच. 12 एफ. पी. 9429) या गाडीने भरधाव वेगाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात गाडीवर बसलेल्या अविष हा उंच उडून जागीच मयत झाला. तर त्याची आजी गंभीर जखमी झाली. गंभीर जखमीला अकलूज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अविषचा मृत्यू पाहून त्याचे आई-वडील व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. अपघातानंतर कारचालक गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, नागरिकांनी पकडले. रात्री उशीरापर्यंत माळशिरस पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता.
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग चौपदरी झाला आहे. या महामार्गावर नातेपुते व माळशिरस शहराकडे येणार्या व 61 फाटा याठिकाणी व बायपासला जाणार्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. अनेकांनी जीव गमावले आहेत. तर दुसरीकडे अनेकजण जखमी झाले आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे. याठिकाणी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे, असे असतानाही प्रशासन याकडे मात्र डोळेझाक करीत आहे. किती जणांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.