

पंढरपूर : गाय गोठ्यासाठी शासकीय अनुदान मिळवून देतो, असे सांगून अधिकृत प्रकरण न करता स्वतःकडील 10 लाख 14 हजार 500 रुपयांच्या, 500 रुपयांच्या 2029 बनावट नोटा दिल्या दिल्या. हे पैसे बँकेत भरण्यासाठी मधुकर माने गेले असता त्यांना हा बनावट नोटांचा प्रकार समजला. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अतुल भारत तावरे (रा. करकंब), राजू विश्ननाथ चोरमले (रा. बार्डी, ता. पंढरपूर) या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
सपोनि श्रीकांत घुगरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यानुसार, अतुल तावरे, राजू चोरमले यांनी संगनमत करून मधुकर माने (वय 22, रा. निमगाव, ता. माढा) यास गाय गोठ्यासाठी शासनाचे 12 लाख अनुदान मिळवून देतो, असे सांगितले होते. माने यांच्याकडून दोघांनी अनुदान मंजूर करण्यासाठी 2 ते 3 लाख घेतले. त्यानंतर अनुदान रक्कम म्हणून माने यास 500 रुपये दराच्या 2029 बनावट नोटा 10 लाख 14 हजार 500 दिल्या. या बनावट नोटा आरोपींनी माने यास दिल्या; मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माने यांनी दोन्हीही आरोपींविरुद्ध तक्रार दिली. शुक्रवारी दुपारी इसबावी (पंढरपूर) येथील मोंढे शोरूमसमोर असलेल्या आर. व्ही. कॉम्प्लेक्समधील गाळा नंबर चारमध्ये ही घटना घडली आहे.
याप्रकरणी अतुल तावरे आणि राजू चोरमले या दौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 178, 179, 180, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केले, तेव्हा न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.