

तुळजापूर : जेष्ठ समाजसेविका पद्मश्री अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या प्रसिद्ध गजलकार ममता सपकाळ यांना पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार जाहीर झाला आहे. 12 जानेवारी 2025 मध्ये अध्यात्मिक गुरु ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
तुळजापुर येथील पुजारी नगर फाऊंडेशनच्या माध्यमातून हा पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देण्याची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांनी केली. या पुरस्कार सोहळ्यासाठी संयोजक समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये संस्कार भारती, आरळी बुद्रुक महोत्सव समिती, तुळजापूर तालुका पत्रकार संघ, मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर यांचा सहभाग आहे. समाजसेविका ममता सपकाळ यांना हा पुरस्कार पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे सहअध्यक्ष गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर, तुळजाभवानी मंदीराचे महंत तुकोजी महाराज यांच्या हस्ते जिजाऊ जयंतीनिमित्त 12 जानेवारीला श्रीनाथ लॉन्स येथे प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रांत संस्कार भारतीच्या प्रदेशाध्यक्ष स्नेहलताई पाठक असणार आहेत.
जेष्ठ समाजसेविका पद्मश्री अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याचे कार्य कन्या ममता सपकाळ करत आहेत. शेकडो अनाथांची ताई म्हणून हिमतीने सांभाळ करत आहेत. त्या कार्याला बळ मिळावे यासाठी पहिलाच राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देण्यात येत आहे. तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे धाराशिव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रति वर्षी नऊ कर्तृत्ववान महिलांना गौरव करण्यासाठी मागील पाच वर्षापासून जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जात होते. यंदा प्रथमच राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळा शक्तीपीठ तुळजाई नगरीत आयोजित करून या पुरस्काराची सामाजिक व वैचारिक उंची वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती मुख्य संयोजक अनिल आगलावे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.