Fireworks Smoke: फटाक्याच्या धुराने आरोग्यावर गंभीर परिणाम
सोलापूर : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा सण, पण फटाक्यांच्या आतषबाजीनंतर हवेची गुणवत्ता मात्र झपाट्याने ढासळते आणि श्वास घेणेदेखील कठीण होऊ लागते. दरवर्षी दिवाळीनंतर देशातील हवामानाचा अहवाल चिंताजनक असतो. फटाक्याच्या धुराने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
दिवे विझल्यानंतर हवेतील धूर, रसायने आणि धूळ यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. या फटाक्यांमधून सल्फर, नायट्रोजन, जड धातू आणि सूक्ष्म कण हवेत पसरतात. हे कण हवेत दीर्घकाळ राहतात आणि आपल्या शरीरात श्वासावाटे प्रवेश करतात. यामुळे फुप्फुसांची क्षमता कमी होते आणि श्वसनाचे आजार वाढतात.
धूर आणि रसायनांमुळे डोळ्यांची जळजळ, पाणी येणे, लालसरपणा वाढतो. फटाक्यांचा मोठा आवाज आणि धूर यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर ताण येतो. कानाच्या पडद्यावर परिणाम, अत्यंत मोठा आवाज कानासाठी धोकादायक असतो. श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. धूरातील रसायने त्वचेवर एलर्जी आणि खाज आणू शकतात.
आपल्या आरोग्यासाठी काही साध्या गोष्टी करणे आवश्यक आहे. बाहेर जाताना मास्क वापरा. शक्यतो हा काळ घरात राहून काढा. खिडक्या, दरवाजे बंद ठेवा आणि हवा स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय करा. थंड हवेत पहाटे किंवा उशिरा व्यायाम टाळा. पुरेसे पाणी प्या, फळे-भाज्यांचा आहार वाढवा. आपल्या परिसरातील हवेची गुणवत्ता मोबाईल ॲप्सद्वारे तपासत राहा.

