

सोलापूर : खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दि.1 ऑगस्टपासून सुरू झाली. याची 14 सप्टेंबरपर्यंत मुदत असणार आहे. नैसर्गिक पीक नुकसान भरपाई, पीक विम्यासह अन्य लाभ घेण्यासाठी पीक पाहणी बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकर्यांनी पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन माहिती तंत्रज्ञान कक्ष महसूल विभागाचे संचालक सरिता नरके यांनी केले आहे.
सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तथापि, शेतकर्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास, आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकर्यांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकर्यांनी खरीप 2025 ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या साहाय्याने सर्व शेतकर्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे 7/12 उतार्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी दि. 1 ऑगस्टपासून करू शकणार आहेत. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प दि. 15 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून, रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्व्हेप्रणालीद्वारे राज्यात लागू करण्यात आली आहे. सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपचे व्हर्जन 4.0.0 अद्ययावत स्वरुपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे.