

सोलापूर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 जानेवारी रोजी मतदानाला शहरभर शांततेत सुरुवात झाली. शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ 6.86 टक्के मतदान झाले होते. संक्रांतीचा सण असल्याने अनेक ठिकाणी महिला वाण लुटण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे सकाळच्या सत्रातील मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. दुपारी साडेअकरापर्यंत 18.8 टक्के मतदान झाले होते.
काही मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या, तर काही ठिकाणी मतदान केंद्रांतर्गत गर्दी कमी होती. दरम्यान, काही केंद्रांवर बॅलेट युनिट अ, ब, क या सिरीयल नंबरप्रमाणे लावणे अपेक्षित होते. मात्र केंद्रप्रमुखांकडून तसे घडले नाही. उलट सुलट मतदान यंत्र लावले गेल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या गोंधळातून काही ठिकाणी उमेदवार आणि केंद्रप्रमुखांमध्ये वादावादीचे प्रकारदेखील घडले.
तथापि, दुपारच्या सत्रानंतर मतदानाला वेग आला. संक्रांतीचे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आटोपून महिला मतदान केंद्रांवर गर्दी करताना दिसत होत्या. ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मतदारांचा सहभाग लक्षणीय होता. एकूणच, सुरुवातीला संथ असलेल्या मतदानाने दुपारनंतर वेग घेतला.
अनेक मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याच्या दिसून आल्या. प्रभाग सातमध्ये शरद पवार प्रशालेमध्ये एकूण 24 मतदान केंद्र आढळून आली. या सर्व 24 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान दिसून आले. प्रभाग सातमधील बहुतांश मतदान याच मतदान केंद्रांवर आढळून आल्याने या भागांमध्ये उमेदवार अमोल शिंदे, पद्माकर काळे, मनीषा माने, उत्तरा बरडे, मनोरमा सपाटे, मनीषा कणसे, सुमित भोसले यांनी ठाण मांडल्याचे निदर्शनास दिसून आले.
सावळागोंधळ चव्हाट्यावर
प्रभाग पाचमधील बाळे येथील अनेक केंद्रांवर दुसऱ्याच्या नावाने मतदान झाल्याच्या घटना घडल्या. बाळे गावातील जिल्हा परिषद शाळा, चंडक प्रशाला, राजीव प्रशाला या मतदान केंद्रांवर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ओळखपत्र न पाहता मतदान करू दिल्यामुळे अनेकांच्या नावावर आधिच मतदान झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मतदान केंद्र प्रमुखांनी ज्यांच्या नावाने मतदान झाले, त्यांना रीतसर फॉर्म भरून पुन्हा मतदान करण्यास मुभा देण्यात आली. यामुळे प्रशासनातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला. मंगल वाघमारे यांच्या नावावर कोणीतरी मतदान करून गेल्याचे आढळले.
प्रभाग पाचमधील चंडक प्रशालेतील मतदान केंद्रावर उमेदवारांच्या नावाच्या पुढे सिक्के मारून बॅलेट युनिट मतदान केल्याचे दस्तुरखुद मंगल वाघमारे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. बाळे प्रभाग पाचमध्ये अशा चार घटना घडल्याचा आरोपदेखील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग सातमधील शरदचंद्र पवार प्रशालेतील मतदान केंद्र तसेच पंजाब तालीम परिसरातील मतदान केंद्रांवर भेटी देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. महापालिकेच्या निवडणुकीतील पहिलीच घटना असावी की, पालकमंत्र्यांनी ग्राउंड लेव्हलवर मतदान केंद्रांमध्ये जाऊन पाहणी केल्याची घटना अशी चर्चा मतदान केंद्र परिसरात होती.