

पंढरपूर : विटभट्टीसाठी माती घेऊन जाणाऱ्या टीपरने दुचाकीला धडक देत चिरडल्याने बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पंढरपूर-टेंभुर्णी रोडवर गुरसाळेजवळील पुलाच्या ठिकाणी शनिवार, 20 डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला. रघुनाथ उत्तम लोकरे (42) व दर्लिंग रघुनाथ लोकरे (13, रा. उजनी ता. माढा) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.
पंढरपूर तालुका पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत दर्लिंग लोकरे हा कोर्टी (ता. पंढरपूर) येथील कै. नारायण मसू हाके प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीमध्ये निवासी विद्यार्थी म्हणून शिकत होता. तो आजारी असल्यामुळे त्याचे वडील रघुनाथ लोकरे हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 45 एएच 0254) कोर्टी येथील शाळेत त्याला घराकडे नेण्यासाठी आले होते.
शाळा सुटल्यानंतर ते पंढरपूरहून- टेंभुर्णीकडे निघाले असताना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आळंदी- पंढरपूर- मोहोळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 गुरसाळे येथील पुलावरून भरधाव वेगाने आढीवच्या दिशेने जात असलेल्या विना नंबरच्या टिपरने गाडीला जोराची धडक देत अक्षरश: चिरडून पुढे नेले. त्यांच्या डोक्यावरून आणि छातीवरून टिपर गेल्याने अपघात घडलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. दर्लिंग हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडिल गॅरेज चालवित होते तसेच शेती करीत होते. अपघात ठिकाणी टिपर सोडून चालक सुरज बिभीषण साळुंखे, रा. खेड भाळवणी (ता. पंढरपूर) हा फरार झाला आहे.