Solapur Farmers Protest: शेतकऱ्यांचे अर्धनग्‍न आंदोलन

थकीत ऊस बिल : मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याची केली मागणी
Farmers Protest
Farmers Protest
Published on
Updated on

सोलापूर : थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. ४) पूनम गेट ते सह प्रादेशिक साखर कार्यालय दरम्‍यान अर्धनग्‍न आंदोलन केले. यावेळी साखर आयुक्‍त डॉ. संजय कोलते यांच्‍याशी फोनद्वारे संपर्क साधून गोकुळ साखर कारखान्‍यांकडील थकीत बिलासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावावी, अशी मागणी केली व जोपर्यंत बिले मिळत नाहीत, तोपर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू ठेवणार असल्‍याचे सांगितले.

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील धोत्री येथील गोकूळ साखर कारखान्‍यांकडील थकीत ऊस बिलासाठी शेकडो शेतकरी गेल्‍या ११ दिवसापासून जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. गुरुवारी शेतकऱ्यांनी पूनम गेट ते सह प्रादेशिक साखर कार्यालय अर्धनग्‍न मोर्चा काढून सह प्रादेशिक साखर कार्यालय येथे दोन तास ठिय्या मारला. त्‍यानंतर पोलिसांनी सह प्रादेशिक साखर आयुक्‍त कार्यालयातील प्रभारी साखर सहसंचालक आबासाहेब गावडे यांना बोलावून आंदोलकांशी चर्चा करायला लावली.

त्‍यावेळी प्रभारी साखर सहसंचालक गावडे यांनी थेट साखर आयुक्‍त कोलते यांच्‍याशी फोनद्वारे संपर्क साधून शेतकरी आंदोलक नेता ॲड. अमोल पाटील, अरविंद गोडके, माजी पंचायत समिती विरोध पक्षनेता बाळासाहेब मोरे यांच्‍याशी बोलणे करून दिले. आयुक्‍तांनी आश्वासन दिल्‍यानंतर आंदोलकांनी सह प्रादेशिक साखर कार्यालय येथील आंदोलन मागे घेतले.

पोलिसांचा होता मोठा बंदोबस्‍त

आंदोलनात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक, ५० पोलिस शिपाई आणि बारा जणांची एक शीघ्र कृती दलाची तुकडी असा मोठा पोलिस बंदोबस्‍त लावण्यात आला होता.

गोकुळ साखर कारखान्‍यास ऊस देऊन सहा महिने झाले आहे. ११० टन ऊस गेले असून, तीन लाख रुपये बिल होत आहे. मात्र, अद्यापही कारखान्‍यांने बिल न दिल्‍याने आर्थिक अडचणींना समोरे जावे लागत आहे. त्‍यामुळे कारखान्‍यांनी तत्‍काळ बिले द्यावीत. अन्‍यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल.
- अमोल सुरवसे, आंदोलक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news