

माढा : शेत वहिवाटीच्या कारणावरून एका शेतकर्याचा लोखंडी कोयत्याने, गळ्यावर, डोकीत, कपाळावर व काठीने मारहाण करून खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री बुद्रुकवाडी (ता. माढा) येथे घडली. संशयित आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माढा पोलिस ठाण्यासमोर दोन तासांहून अधिक काळ आंदोलन केले.
कांतीलाल ज्ञानदेव माने (वय 52, रा.बुद्रुकवाडी) असे खून झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. भिवा संपत्ती बुद्रुक (रा. बुद्रुकवाडी) असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेबाबत मयताची मृताची पत्नी अनुराधा कांतीलाल माने यांनी फिर्याद दिली.
कांतीलाल माने हे गावातील संदीप पाटील यांची शेत वहीवाटत होते. याचा राग भिवा बुद्रुक याला होता. कांतीलाल हे शेतातील विहिरीवरील मोटार सुरु करण्यासाठी गेले असता भिवा बुद्रुक याने लोखंडी कोयत्याने, गळ्यावर, डोकीत, कपाळावर व काठीने मारहाण करून कांतीलाल यांचा खून केला. या घटनेनंतर आरोपीच्या तपासासाठी श्वानपथक घटनास्थळी आणून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशयित आरोपी अद्यापही फरार असून घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल हे करीत आहेत.